Home » जळगाव » धरणगाव » नेत्रदान नव्हे, प्रकाशदानाची सामाजिक चळवळ – पालकमंत्री पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम

नेत्रदान नव्हे, प्रकाशदानाची सामाजिक चळवळ – पालकमंत्री पाटील यांचा प्रेरणादायी उपक्रम

जळगाव | ३१ मे – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या तत्त्वाशी एकनिष्ठ राहून गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया उपक्रम राबवताना मला आत्मिक समाधान मिळते. कुणाच्या जीवनात प्रकाश पेरण्याचा हा खरा दिव्य अनुभव आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य आणि पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे GPS मित्र परिवार व भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात ३०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील १०५ रुग्णांना पनवेल येथील आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. हे सर्व रुग्ण लक्झरी व चारचाकी वाहनांतून सन्मानपूर्वक पनवेलकडे रवाना करण्यात आले. पुढील दोन दिवसांत आधुनिक पद्धतीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

या उपक्रमात डॉ. सुदेश पाटील, डॉ. सुजय कोल्हापुरे, डॉ. अर्पिता जाधव, डॉ. प्रिया साळवी, चंदन चौधरी, प्रकाश पाटील, राहुल चौधरी यांच्या तज्ज्ञ पथकाने सेवाभावाने कार्य केले. रुग्णांच्या राहण्यापासून औषधोपचारापर्यंत सर्व व्यवस्था GPS मित्र परिवाराने पालकमंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले.

कार्यक्रमास सरपंच विजय पाटील, धनराज कासट, चंदन कळमकर, संजय महाजन, प्रशांत झवर, दिनेश कडूसे, आदींसह अनेक मान्यवर आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी अशाच शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजूंना दृष्टिप्रकाश मिळवून देण्याचे कार्य समाजात माणुसकी, दया आणि करुणा जपणाऱ्या नेतृत्वाचे मूर्त उदाहरण ठरत आहे. पाळधीची भूमी आज या माणुसकीच्या झळाळत्या प्रकाशाने उजळून निघाली.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *