चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील वढोदा येथे २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील लोकल लाईनचा तार जोडण्यास गेले असता तालुक्यातील वढोदा येथील २४ वर्षीय दीपक तुकाराम पाटील या तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, वढोदा येथील रहिवासी व संपूले आश्रम शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर गोरख पाटील यांच्या वढोदा शिवारातील शेतातील शेत पंपाचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील हे दीपक पाटील यांना शेतात घेऊन गेले. या वेळी दीपक वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असता त्याला जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी दीपकला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा ३० रोजी सकाळी ८ वाजता वढोदा येथून निघणार आहे.
तुकाराम पाटील व छोटाबाई पाटील हे शेत मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. तर त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक याने उच्च शिक्षण घेत तो गावातील शेत पंपाच्या दुरुस्तीचे काम करत होता. मात्र, या वेळी पंप दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेला मनमिळाऊ दीपकचा दुर्दैवी अंत झाल्याने पाटील परिवारातील एकुलता एक दीपक विझला आहे. या दुःखद व दुर्दैवी घटनेमुळे वढोदा गावावर शोककळा पसरली आहे. या वेळी उपजिल्हा रुग्णालयात जिपचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, आबा देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
