पुणे : वृत्तसंस्था
आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.
पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला .तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली.सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग ही आयोजित करण्यात आलेला.
अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मोगऱ्याच्या हजारो फुलांची सजावट करण्यात आली . महालक्ष्मी देवीला मोगऱ्याचा पुष्प पोशाख परिधान करण्यात आला . मंदिराचा गाभारा व सभामंडपात विविधरंगी फुलांची आरास आणि मोग-याच्या लाखो सुवासिक फुलांचा गंध अनुभविण्याकरिता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आयोजित मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी मंदिरात देखील फुलांची आरास करण्यात आली.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला. तब्बल १०० किलो मोगरा, गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, तगर, झेंडू, कार्नेशियन, आॅर्किड यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. मंदिरातील तिन्ही देवींसमोर नैवेद्य देखील दाखवण्यात आला. फुलांची आरास पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.
