पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय अनेक ठिकाणी सुरु असतांना आता खराडी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील तिघींसह सहा तरुणींची सुटका केली. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. मालकाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक लेनखौके किपगेन (३०, रा. मणीपूर) याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक विकास किशोर ढाले (३०, रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पूजा हडाळे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी-मुंढवा रस्त्यावर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.
मसाज सेंटरचा व्यवस्थापक किपगेन आणि मालक ढाले यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत थायलंडमधील तीन तरुणींसह सहाजणींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालायच्या आदेशाने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
