मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक घरात, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे.
कमी दाब प्रणाली गुजरातच्या दिशेनं सरकल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर आता काही प्रमाणात ओसरला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहणार असून, तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.
राज्यात सध्या ढगाळ वातावरणासह ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आजपासून मुंबई, पुण्यासह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होणार आहे. २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आता ३० सप्टेंबर नंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
