चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव येथे वाहन पार्कीग करण्याच्या कारणावरुन शिवभक्तांसह सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी शिवभक्तांनी तुम्ही दादागिरी करीत आहात का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सपोनि भरत चौधरी यांनी हो मी करणार दादागिरी असे म्हटल्यामुळे त्यांच्यातील वाद अधिकच वाढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची गंभीररित्या दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सपोनि भरत चौधरी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात शक्तीग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहने पार्कीगच्या कारणावरुन काही शिवभक्तांसह बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढतच गेल्याने याठिकाणी मोठ्याप्रणात शिवभक्त जमा होवून त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते
शिवप्रेमी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यातील वाद वाढत असल्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी मध्यस्ती करीत शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवप्रेमींनी पोलीसांनी दादागिरी करावी परंतू ती गुंड आणि गुन्हेगारांवर करावी, जनतेवर नाही असे म्हणत रोष व्यक्त केला.
या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गांभीर्याने दखल घेत, तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. याबाबतची अधीकृत माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि अमितकुमार मनेळ यांनी दिली.



