Home » जळगाव » तापी नदी पुलावरून घेतली तरुणाने उडी; दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

तापी नदी पुलावरून घेतली तरुणाने उडी; दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील तापी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा गुरुवारी (दि. १९) सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नसल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षल सोनार (वय ३२, रा. काजी प्लॉट, मोती किराणा) असे तरुणाचे नाव असून, बुधवारी (दि. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  हर्षल सोनार हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अचानक तापी नदीवरील पुलावरून नदी पात्रात उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाच्या मदतीने नदी पात्रात शोधमोहीम सुरू केली. बुधवार रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून दिवसभर आणि सायंकाळी उशिरापर्यंतही बचाव पथकाकडून नदी परिसरात सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र अंधार पडूनही संबंधित तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. नदीतील पाण्याचा प्रवाह आणि खोल पाण्यामुळे शोधकार्याला अडथळे येत असल्याची माहिती मिळाली.. संबंधित तरुणाचा शोध लागेपर्यंत शोधमोहीम व तपास सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

उडी घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून कुटुंबीय व मित्र परिवाराकडून चौकशी करण्यात येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, हर्षल सोनार हे शांत व सर्वसामान्य स्वभावाचे होते. त्यांच्या वर्तनात अलीकडे कोणताही तणाव जाणवला नसल्याचेही काहींनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने पुलाजवळ अनावश्यक गर्दी करू नये व सुरू असलेल्या शोधमोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *