जळगाव : मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी माध्यमाच्या शाळांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी दिसून येत होती.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी स्वतः थिएटरमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद. चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत कलाकारांनी मराठी भाषेचे महत्त्व, वाचनाची आवड आणि शिक्षणाचे मूल्य यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.

विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण व्हावा, मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व पटावे आणि शिक्षणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या संपूर्ण उपक्रमासाठी अर्चना राणे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच वातानुकूलित थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव, कलाकारांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी मुलांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
चित्रपटातून “मराठी भाषा जगवा, मराठी शाळा टिकवा” हा मोलाचा संदेश देण्यात आला. “मराठी भाषा तर अभिजात झाली, पण मराठी शाळा कधी अभिजात होणार?” हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
शाळेच्या वतीने या उपक्रमासाठी अर्चना राणे तसेच सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
Author: K P Chavan
thepubliclive



