धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे. मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. कळंब तालुक्यातील डिकसळ येथे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
शेतकरी हा महत्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांची लेकरे आहोत. त्यामुळे, अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला १५ दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका. आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार आहेत. दिवाळीनंतर या बैठकांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या शंभर वर्षात शेती प्रश्नावर उभारले नाही असे आंदोलन उभे करण्याचा निर्धार आहे. नुसते वावरात फिरल्याने, भाषण केल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार ऊभा राहणार नाही. शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल, कर्जमुक्ती करायची असेल, नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकतीने आंदोलन लावून धरावे लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असेही पाटील यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला, फडणवीसांचे कौतुक करत दिलेला शब्द पाळा ही विनंतीही जरांगे पाटील यांनी आरक्षण प्रमाणपत्र वाटपावरुन केली आहे.
