Home » ताज्या » ८ लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश : रावेर पोलिसांच्या जाळ्यात ७ आरोपी; मुख्य सूत्रधार फरार

८ लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश : रावेर पोलिसांच्या जाळ्यात ७ आरोपी; मुख्य सूत्रधार फरार

रावेर : प्रतिनिधी

बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजता खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांच्या दुचाकीला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. मात्र, पोलिसांनी रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रावेरमधील बंडू चौक परिसरातून ७ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फारुख शेख रईस (१९), अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादर उर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू, राहील खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या आणि अक्रम खान इस्माईल खान यांचा समावेश आहे. आरोपींकडून २ लाख ५५ हजार रुपये रोख आणि ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथक आणि सायबर विभागाने ही कारवाई यशस्वी केली. या धडाकेबाज कारवाईमुळे रावेर परिसरात पोलिसांबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *