जळगाव,प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या बेवारस पुरुषाचा मृतदेह हा नैसर्गिक नसून, त्याचा खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण?

९ जानेवारी २०२६ रोजी अजिंठा चौफुलीजवळील बाबा बॅटरी समोर एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
तपासाची चक्रे फिरली
सदर इसमास कोणीतरी मारहाण करून ठार मारल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक नेमून तपासाची सूत्रे हलवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने मृताची ओळख पटवली.
ओळख आणि आरोपी
मृत व्यक्ती हा भाऊसाहेब अभिमान पवार (वय ५८, धंदा वेटर, रा. पातोंडा, ता. अमळनेर) असल्याचे निष्पन्न झाले. ते आसोदेकर श्री मटन हॉटेलमध्ये काम करत होते. तसेच, भाऊसाहेब यांना हाता-बुक्क्यांनी मारहाण करून व गळा दाबून खून करणारा आरोपी हुसेन शेख अयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) असल्याचे उघड झाले.
अटक आणि पुढील कारवाई
पोलिसांनी नशिराबाद, अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर, नेरीनाका, रेल्वेस्टेशन, बसस्टॅन्ड परिसरात शोध घेऊन आरोपी हुसेन शेख याला ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हवाली केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे पुढील तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Author: K P Chavan
thepubliclive



