नाशिक : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही महिन्यापासून महागाईने सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना आता येत्या 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. आता एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना जास्तीचं शुल्क लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी 21 ऐवजी 23 रुपये जास्त द्यावे लागतील.
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होते. एटीएम चालवण्याचा खर्च वाढला असल्याने त्यांना तोटा होत आहे. यावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती. ती आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन नियम 1 मे पासून लागू होईल.
आतापर्यंत एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी 2 रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच 1 मे पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारांसाठी 23 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे एटीएममधून वारंवार पैसे काढणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
मोफत मर्यादेबाबत कोणताही बदल केलेला नाही. तुम्ही दरमहा बँकेच्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढू शकतात. मेट्रो शहरांमध्ये इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 मोफत व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार उपलब्ध राहतील. जर तुम्ही निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तरच नवीन शुल्क लागू होईल. वाढीव शुल्क टाळण्यासाठी तुम्ही फक्त मोफत मर्यादेत व्यवहार करु शकता. रोख रकमेची गरज कमी करा. त्याऐवजी डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय अधिक वापरणे फायदेशीर ठरेल.
