अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील शिरूड नाका परिसरातील ३६ खोली भागात ३१ ऑगस्टला रात्री ९.३० वाजता खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५) मृत्यू झाला असून संशयित आरोपी भूषण राजेंद्र रासने (वय ३६) असे त्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, खर्चासाठी पैसे न दिल्याने झालेल्या वादातून भूषण याने नशेत हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेंद्र रासने यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळावरून रक्ताने माखलेली हातोडी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण रासने याला पोलिसांनी अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पो.उ.नि. शरद काकळीज यांनी दिली. दरम्यान, राजेंद्र रासने हे जखमी अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती ऋत्विक भामरे याने पो.कॉ. अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांना सांगितली. त्यानंतर लागलीच पो.नि. दत्तात्रय निकम, स.पो.नि. रवींद्र पिंगळे, स.पो.नि. सुनील लोखंडे, पो.उ.नि. शरद काकळीज, समाधान गायकवाड, हे.कॉ. लक्ष्मीकांत शिंपी, मिलिंद सोनार, नितीन मनोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
