Home » महाराष्ट्र » साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याने तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू !

साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याने तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

शहरातील बोरावल गेट भागात साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे याप्रकरणी सात जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या सात जणांनी २ जून रोजी सोमवारी रात्री आरिफ नजीर पटेल (वय ४३) यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल, अनिसा जावेद पटेल आणि यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन आरिफ पटेल यांच्या डोक्यावर वार करत त्यांना जबर दुखापत केली. यावेळी एका महिलेचा विनयभंगही करण्यात आला. या हाणामारीत महिला व पुरुष असे एकूण पाच जण जखमी झाले होते. आरिफ पटेल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. या किरकोळ वादातून एका कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या हाणामारीत गंभीर जखमी झालेले आरिफ पटेल हे कोमामध्ये होते आणि त्यांच्यावर गेल्या ६० दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. आता या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेच्या खुनाच्या कलमांची वाढ करण्याची कार्यवाही यावल पोलिसांकडून केली जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक वाढवे हे पुढील तपास करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *