सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच सोलापूर आणखी एका डॉक्टरच्या आत्महत्येने हादरले आहे. येथील डॉक्टर आदित्य नाम्बियार नामक नवख्या डॉक्टरने स्वतःचा गळा कापून आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी हे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, आदित्य नाम्बियार यांनी नुकतेच आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. ते सोलापुरात एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. ते शहरातील एका किरायाच्या घरात राहत होते. याच घरात त्यांनी मंगळवारी सकाळी स्वतःचा गळा कापत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. आदित्य यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली होती. वळसंगकर हे राज्यातील एक सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन होते. त्यामुळे त्यांनी उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे सोलापूरसह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.



