Home » जळगाव » रावेर-विवरे मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात, दोन तरुण ठार

रावेर-विवरे मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात, दोन तरुण ठार

रावेर : प्रतिनिधी

विवरे खुर्द येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही मृत तरुण एकुलते व अविवाहित असल्याने संबंधित कुटुंबांवर एकाच वेळी शोककळा पसरली आहे. ही घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रावेर-विवरे मार्गावरील श्री बिजासनी माता मंदिराजवळील पुलानजीक घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विवरे खुर्द येथील शुभम गजानन लोखंडे (वय २१) हा युवक त्याची आजी सुमित्राबाई जयवंत लोखंडे यांना दुचाकी (एमएच १९ बीए ८८४५) वर बसवून रावेरकडे येत होता. त्याचवेळी जुन्या सावदा रोडवरील आधारकार्ड केंद्राचा ऑपरेटर विनय विजय भालेराव (२४, रा. कोळोदा, ता. रावेर) हा दुचाकी (एमएच १९ डीएस ५३२३) ने भुसावळकडे जात होता. दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेल्या आजी सुमित्राबाई लोखंडे तसेच दुसऱ्या दुचाकीचा चालक विनय भालेराव हे गंभीर जखमी झाले. सुमित्राबाई यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विनय भालेराव याच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालय व रावेर, फैजपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी भुसावळ येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. भुसावळ येथील खासगी रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले. मयत शुभम लोखंडे हा एकुलता एक मुलगा होता, तर विनय भालेराव हा कोळोदा येथील पोलिस पाटील विजय रामदास भालेराव यांचा एकुलता मुलगा होता. याप्रकरणी प्रमोद लक्ष्मण लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत मयत विनय विजय भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास हुसेन तडवी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *