नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील मराठी भाषेसाठी काही दिवसापूर्वी ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर आले होते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची एकत्रित बैठक नाशिक मध्ये आयोजित करण्यात आली होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र दोन्ही पक्षाच्या या पहिल्याच एकत्रित बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या बैठकीतील मुद्द्यांची चर्चा रंगल्या पेक्षा बैठकीतील राड्याचीच जोरदार चर्चा नाशिकमध्ये रंगली होती.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह सर्वच नेत्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत नाशिक शहरातील रस्त्यावरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित होणारा पाणीपुरवठा, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर चर्चा होणार होती. मात्र या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आपसांत भिडले. त्यामुळे बैठकीला वेगळेच वळण प्राप्त झाले होते. ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे यांनी आपल्या भाषणामध्ये विधानसभा निवडणुकीत स्वतःचे अनुमान मांडले. त्यात नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात वसंत गिते यांचा पराभव का झाला? याचा उहापोह देखील त्यांनी केला.
निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एमडी ड्रग्ज आणि इतर मुद्दे आपण नीट हाताळले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी या निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी असलेले माजी महापौर विनायक पांडे यांनी दिंडे यांनी मांडलेला मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही गटामध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
