जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दूध फेडरेशन परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून अभिषेक हरिप्रसाद शर्मा (वय २१, रा. आहुजानगर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना दि. १८ रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील आहुजा नगरात राहणारा अभिषेक शर्मा हा एका इलेक्ट्रिक दुकानात काम करीत होता. तर अभिषेकचे वडील हरिप्रसाद हे हातमजुरी करून परिवाराचा उदारनिर्वाह करतात. अभिषेक हा त्याचा मित्र पवन कोळी यांचेसह रविवारी दि. १७ रोजी ७ वाजता घरून जळगावात छत्रपती शिवाजीनगर परिसरात आला असताना दूध फेडरेशन परिसरात त्याची भरधाव दुचाकी दुभाजकाला जोरात धडकली. यात अभिषेकला जबर मार लागल्याने जळगाव खुर्द येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर पवन कोळी हा किरकोळ जखमी झाला होता. दरम्यान, अभिषेक शर्मा याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी रात्री ११ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
