Home » जळगाव » अमळनेर » भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी !

भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी !

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील श्रीरंग कॉलनी परिसरात भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाणे येथे चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ नगर, अमळनेर येथे राहणारे चंद्रकांत धनराज पाटील (वय ४४, मूळ रा. अमळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ११ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता ते त्यांच्या दुचाकीने (एमएच १९, सीई ७९४७) विजय मारुती मंदिराकडे जात होते. श्रीरंग कॉलनीजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकीने (एमएच १९, इए ५३४९) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की चंद्रकांत पाटील यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून चेहरा व कपाळालाही मार लागला आहे. तसेच शरीराच्या विविध भागांना मुका मार लागल्याचे सांगण्यात आले.

अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा गुन्हा अमळनेर पोलिस ठाणे येथे नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *