Home » राष्ट्रीय » अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात हवाई हल्ले; दक्षिण आशियात तणाव वाढला : 55 सैनिक ठार !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात हवाई हल्ले; दक्षिण आशियात तणाव वाढला : 55 सैनिक ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चिघळला असून गुरुवारी रात्री उशिरा सीमेलगत भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांनी परस्परविरोधी दावे करत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे सांगितले आहे.

अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात तालिबानी लढवय्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ५५ जवान ठार झाल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी केला असल्याचे टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. अफगाण सरकारच्या मते, २३ पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह त्यांच्या ताब्यात असून काही सैनिकांना जिवंत पकडण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराचे एक मुख्यालय आणि १९ चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावाही करण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे उप-प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, एक रणगाडा आणि अन्य लष्करी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनुसार, प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ‘गजब लिल हक’ नावाचे लष्करी ऑपरेशन सुरू केले आहे. पाकिस्तानच्या वायुसेनेने काबुल, नंगरहार, कंधार आणि बक्तिका येथे हवाई हल्ले केल्याचे सांगितले जाते. पाकिस्तान सरकारचा दावा आहे की या कारवाईत ७२ अफगाण तालिबानी लढवय्ये ठार झाले असून १२० हून अधिक जखमी झाले आहेत. १६ तालिबानी चौक्या उद्ध्वस्त केल्याचा आणि ७ चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हवाई हल्ल्यांचे कथित व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांनी म्हटले की, कोणत्याही चिथावणीशिवाय झालेल्या गोळीबाराला पाकिस्तान कठोर आणि प्रभावी प्रत्युत्तर देत आहे. त्यांच्या मते, या चकमकीत केवळ २ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून ३ जखमी झाले आहेत. तसेच ३६ अफगाण लढवय्ये ठार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ अली झैदी यांनी कोणत्याही पाकिस्तानी सैनिकाला पकडल्याचा दावा फेटाळून लावला आहे. या चकमकीनंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला असून सीमाभागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *