पुणे : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत राज ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निमित्ताने तुम्ही महाविकास आघाडीसोबत दिसत असल्याचा सवाल करताच, राज ठाकरे म्हणाले. “मी २०१७ मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे. कोणा बरोबर होणार हे महत्त्वाचे नाही. २०१७ च्या पत्रकार परिषदेत मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेसपण होती. विशेष म्हणजे अजित पवार पण त्यावेळी होते. आज त्यांनी देखील आमच्याबरोबर यायला हवं होतं. कारण ते त्यावेळी तावातावाने बोलत होते, मुद्दे मांडत होते,” असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केली. यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, “कुणीही मिमिक्री केली तरीही माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. काम करणारा मी माणूस आहे, मी काम करत राहीन, मिमिक्री कोण करतात? मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यावर तुम्ही राज ठाकरेंना विचारणार जाणार की, अजित पवार असे म्हणत होते. मला या सगळ्यात पडायचे नाही,” असे अजित पवार यांनी सांगितले.
