अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील कामतवाडी येथून जळगावला गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील ९० हजार २४६ रुपये किमतीचा ४ किलो ५४६ ग्रॅम गांजा आणि ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर माहितीनुसार, २८ रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, कामतवाडी गावाहून दुचाकी (एमएच१९/डीआर९७९१) वर जळगावला गांजा विक्रीसाठी नेण्यात येत असताना ही कारवाई करण्यात आली. पो. नि. निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन हेकॉ सुनील जाधव, राहुल पाटील, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, उदय बोरसे, समाधान सोनवणे, सुनील पाटील यांना घेऊन कामतवाडी येथे तोरणामाता मंदिराजवळ सापळा रचला.
मोटरसायकलवर दोन इसम आले असता पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याजवळ गोणीत ४ किलो ५४६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता राकेश गुलाब पाटील (२७) व मागे बसलेला करण गजानन भिल (२१, वागळुद, ता. धरणगाव) असे नाव सांगितले. पोलिसांनी गांजा व दुचाकी जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास पोनि दत्तात्रय निकम करीत आहेत. रेल्वे स्टेशनच्या गेटच्या आडोशाला टपरीच्या बाजूला काही जण गांजा ओढत असल्याची माहिती मिळताच पोउनि राजू जाधव, प्रशांत पाटील, मिलिंद सोनार, नीलेश मोरे, विनोद संदानशिव यांनी छापा टाकला. यावेळी शुभम पाटील (२८, बंगाली फाईल) याला अटक करण्यात आली.
