जळगाव : प्रतिनिधी
सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोकाटेंवर अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता असून, अटक झाल्यास त्यांचे मंत्रिपद जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताकारण तापले असून, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आज अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सकाळी अकरा वाजता ते संसद भवनात दाखल झाले असून, जवळपास तासभर तेथे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील अधिकृतपणे समोर आलेला नसला, तरी राज्यातील सध्याचा राजकीय घटनाक्रम तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडील जबाबदाऱ्या आता कुणाकडे सोपवायच्या, असा थेट प्रश्न अजित पवार यांना केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. गौरतलब आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर झालेल्या तीव्र टीकेमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी त्यांच्याकडील कृषिमंत्रिपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आल्यानंतर कृषिमंत्रिपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले, तर क्रीडामंत्रिपद कोकाटेंकडे देण्यात आले होते. आता कोकाटेंवर अटक वॉरंटाची टांगती तलवार असल्याने त्यांच्या जागी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची वर्णी लागणार का, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.



