चाळीसगाव : प्रतिनिधी
बाजार समितीत हमाली काम करुन तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे सायलने घरी परतत असताना मागाहून येणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी – टँकर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील मजूर आण्णा वाल्मीक तांबे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करत होते. कामावरून घरी खडकी बुद्रुक येथे सायकलवरुन जात असताना मागून चाळीसगावकडून मनमाड कडे जाणारा टँकर (एमएच ४१, एयू ७५८०) ने सायकल स्वार आण्णा तांबे या ६० वर्षीय वृद्धास धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टँकरचा चालक जावेद शेख (रा. मनमाड) यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मृत झालेल्या आण्णा तांबे यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली असा परिवार असल्याचे समजते. ते खडकी ग्रामपंचायतीचे सदस्य व ठेकेदार नाना तांबे यांचे चुलत बंधू होते.
