अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राजाय्तील अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राहाता तालुक्यात रविवारी कौटुंबिक वादाने त्रस्त झालेल्या एका बापाने आपल्या चार लहान मुलांसह आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अरुण काळे (वय 30, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नीसोबतच्या वादामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अरुण काळे यांचा आठ दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादामुळे त्यांची पत्नी त्यांना सोडून आपल्या माहेरी येवला येथे निघून गेली होती. पण ती परत येत नव्हती. अरुण काळे आपल्या चार मुलांसह मोटारसायकलवरून श्रीगोंदा येथून कोहाळे शिवारात आले. शिर्डी-नगर बायपासजवळ मोटरसायकल उभी करून त्यांनी चारही मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही उडी मारली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
या घटनेत अरुण काळे यांच्यासह त्यांची मुलगी शिवानी (वय 8) आणि तीन मुले प्रेम (वय 7), वीर (वय 6) आणि कबीर (वय 5) यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित दोन जणांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांना अरुण काळे यांचा मृतदेह एक हात व एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर अरुण काळे यांची मोटारसायकल उभी आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ते आपल्या मुलांसह मोटारसायकलवरून राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात आले होते. शिर्डी–नगर बायपासलगत वाहन उभे करून ते मुलांसह विहिरीपर्यंत गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मृतांपैकी दोन मुले अहिल्यानगरमधील आश्रमशाळेत शिकत होती. घटनेच्या दिवशी अरुण काळे यांनी आपल्या दोन मुलांना आश्रमशाळेतून घरी आणले होते. ध्वजारोहणानंतर त्यांनी मुलांना पत्नीच्या माहेरी नेण्याचे सांगितले होते. मात्र, कोऱ्हाळे शिवारात येताच त्यांनी चारही मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही उडी घेतली. एका क्षुल्लक कौटुंबिक वादातून पाच निष्पाप जीवांचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक पास करत आहेत.
