मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या वेबसाइटच्या तांत्रिक अडचणी आता महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य केलेली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करताना ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहेत यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
योजनेतील बोगस अर्ज रोखण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेमुळे कागदपत्रांची अचूक छाननी होऊन केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वारंवार हँग होणे, त्याचे सर्वर डाऊन असणे या अशा समस्यांमुळे त्यांची नोंदणी पूर्ण होत नाही. सायबर कॅफेवर रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी होत नसल्यामुळे महिलांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खाली वाचा कशी करायची e-KYC?
ई केवायसी करण्यासाठी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
वरील पोर्टलवर गेल्यानंतर महिलांना प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा लागेल.
हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
आधार क्रमांकानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकावा. त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे.
त्यानंतर आधारवरून आलेला 6 अंकी कोड प्रविष्ट करावा.
अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला 1) माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्तीवेतनाचा लाभ घेत नाही, 2) माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरुपात उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे तुमची ई-केवायसी पूर्ण होईल.
