जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहननगर व रिंगरोड परिसरात या घटना घडल्या.

सविस्तर वृत्त असे की, पहिली घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. शहरातील देवेंद्र नगर येथे राहणाऱ्या सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३) या दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या. मोहननगर परिसरात त्यांच्या दुचाकीच्या मागून एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यातील एका इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४० हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चैन व दोन हजार रुपये किमतीची दोन भारांची चांदीची चैन झडप घालून ओढून घेतली आणि दोघेही भरधाव वेगाने पसार झाले. सीमा सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरटे नजरेआड झाले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
दुसरी घटना रिंगरोड परिसरात घडली. एका महिला दुचाकीवरून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने तत्काळ प्रसंगावधान दाखवत पोत एका हाताने घट्ट पकडून ठेवली. मात्र झटापटीत सुमारे तीन ग्रॅमचे मनी चोरट्यांच्या हाती लागले. संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार न दिल्याने या घटनेची अधिकृत नोंद झालेली नाही. सलग घडलेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



