जळगाव : प्रतिनिधी
लामा जीनमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची पिशवी घेवून चोरटे पसार झाले. ही घटना बुधवार दि. २५ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास पिंपळे रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीन मध्ये जात होते. यावेळी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेले तीन संशयित मोटरसायकल स्वार त्यांच्याजवळ आले. त्यांनी दुचाकस्वार यतीन कोठारी यांचा चष्मा काढून फेकला त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्याचवेळी त्यांच्या जवळील साडे पाच लाख रुपयांची पिशवी खाली पडली आणि चोरटे ती पिशवी घेऊन फरार झाले. व्यापाऱ्याने घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. मात्र पिंपळे रोडला दोन्ही बाजुला रिंगरोड आहे व सरळ रस्ता देखील आहे, त्यामुळे आरोपी नेमके कोणत्या दिशेने गेले त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
घटना घडलेल्या ठिकाणी या रस्त्यावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. तसेच व्यापारी येथे मोठी रक्कम घेवून येत असल्याचे चोरट्यांचा माहिती असावे आणि त्यांनी रेकी करीत ही भरदिवसा इतकी मोठी रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय काकळीज करीत आहे.


