मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ पोलिसांनी एका मालवाहू ट्रकचा सिने स्टाइल पाठलाग करत तब्बल ७७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. ट्रक मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने जुलै २०२५ पासून राज्यात गुटख्याच्या निर्मिती, साठा आणि वाहतुकीवर बंदी लागू केली आहे. मात्र, या बंदीनंतरही मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर मार्गे मुक्ताईनगर तालुक्यातून गुटख्याची तस्करी सुरू असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
३ सप्टेंबरच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुऱ्हाणपूरहून गुटखा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पूर्णाड फाट्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी एका मालवाहू ट्रकला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने पळवून नेला. यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरू केला. बोदवड रस्त्यावरील सारोळा गावाजवळ ट्रक थांबवून तपासणी केल्यावर ट्रकमध्ये ७७ लाख रुपयांचा गुटखा, २५ लाखांचा ट्रक आणि १२ हजारांचा मोबाइल, असा एकूण एक कोटी दोन लाख ३३ हजार चारशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, रतन गिते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेटे, अशी तडवी, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांनी ही कारवाई केली.
