मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातील चिपळूण येथे काँग्रेसच्या विभागीय प्रशिक्षण शिबिरात आज भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा संविधानाभिमुख आहे, तर भाजपची विचारधारा मनुस्मृतीसारखी अस्पृश्यता मानणारी आहे.”

सपकाळ यांनी आरोप केला की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघला सत्ता व संपत्ती हवी असून, त्यांनी सर्व यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. “हिंसा, द्वेष, अपप्रचार आणि देशाचा फायदा मूठभर लोकांना मिळावा ही त्यांची संकल्पना आहे,” असे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी सांगितले, “हा देश सर्वांचा आहे. संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, संविधानानुसार चालणारा भारत – हे काँग्रेसचे ध्येय आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाने सर्व विचारधारांचा समावेश केला होता, जे आजही काँग्रेसच्या दृष्टिकोनाचे मूळ आहे.”
सपकाळ यांनी पुढे जोडले की, “काँग्रेसवर अनेक वेळा दबाव आणला गेला, पण ही पार्टी संपणार नाही. राहुल गांधी यांनी सर्वांना धैर्य दाखवण्याचा संदेश दिला आहे. दबाव, दहशत किंवा भय न बाळगता विचारधारेची लढाई जिंकणार्यांचेच हे युग असेल.”


