मुंबई : वृत्तसंस्था
देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्वीटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या विषयासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. त्यामुळे “नेमका कोणता मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. “निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. जर तयारी नव्हती तर निवडणुका घेण्याची गडबड कशासाठी केली? ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हा सर्व पोरखेळ सुरू आहे. या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,’ अशी टीका त्यांनी केली.



