मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसिद्धीचे वेड लागल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. ब्रिटनचे पंतप्रधान नुकतेच मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी जागोजागी बॅनर लावलेत. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? त्यांचे बॅनर पाहिले की, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? असे वाटते. कारण, या लोकांना स्वतःच्या प्रसिद्धीचे वेड लागले आहे, असे उद्धव उपरोधिकपणे बोलताना म्हणाले.

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मुंबईतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांचे शिवसेनेत स्वागत. मला जे बोलायचे होते ते मी भर पावसात शिवाजी पार्कला बोललो आहे. आत्ता तेच बोलत-बोलत मी पुढे जाणार आहे. आज तुम्ही एका उत्साहाने व प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलात. काही जणांनी दसरा मेळाव्यात मला तुम्ही पुढचा कार्यक्रम काय देणार? असा प्रश्न केला होता. पुढचा कार्यक्रम हाच आहे की, खरी देशभक्ती काय आहे? खरे हिंदुत्व काय आहे? हे आपल्याला सर्वांना समजून सांगायचे आहे. कारण, काही जणांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या गेल्यात.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी ब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर यांच्या मुंबई दौऱ्याचा दाखला देत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते त्यांचे नाव टाळत म्हणाले, तुम्ही येताना पाहिले असेल की, संपूर्ण परिसर होर्डिंग व बॅनरने बरबटून टाकण्यात आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते. पण त्यांचे स्वागत आपले उपमुख्यमंत्री करत होते. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? आज सकाळी संजय राऊत चांगले बोलले. ते बॅनर पाहिले की असे वाटते की, ब्रिटनच्या पंतप्रधानांची शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? काही सांगता येत नाही. कारण, यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे म्हणजे जाहिरातबाजी करण्याचे व स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याचे वेड लागले आहे.
शेतकरी तिकडे आक्रोश करतोय. त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी लबाड पॅकेज देण्यात आले. मी त्याचा उद्याच्या मराठवाड्यातील हंबरडा मोर्चात समाचार घेणारच आहे. पण या सगळ्या मंत्र्यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे एक वेड लागले आहे. अरे कामे केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही. लोकं स्वतःहून तुमचे कौतुक करतात. पण ती कुवत राहिली नाही. त्यामुळे ते अशी पोस्टरबाजी करत आहेत. असो, आज मला बरे वाटत आहे की सगळे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत परतलेत. या संघर्षाच्या काळात खरी शिवसेना काय आहे हे तुम्ही दाखवून दिले. तुम्ही सर्वांना शुभेच्छा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



