मुंबई : वृत्तसंस्था
एसटीच्या सुमारे 85 हजार कर्मचारी व अधिकार्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासह वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचार्यांना दिवाळी अग्रीम म्हणून 12 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला.
एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एसटी कर्मचार्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचारी व अधिकार्यांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच 2020-24 दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचार्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांनाही पूर्वीप्रमाणे 12 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
