जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर गुलाबराव देवकर यांच्या अडचणी कमी होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नसल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांपूर्वीच म्हणजे 3 मे रोजी जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेश करून तीन दिवसही पूर्ण होत नाहीत तोवर देवकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गुलाबराव देवकर यांच्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाप्रकरणी ही चौकशी करण्यात येत आहे.
सोमवारी धुळे येथील उपजिल्हा निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वात चौकशी पथक जिल्हा बँकेत पोहोचले होते. श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चौकशी करण्यात येत आहे. गुलाबराव देवकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गुलाबराव देवकर यांनी हे कर्ज विधानसभा निवडणुकीच्या काळात बेकायदेशीरपणे घेतले असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री व देवकर यांचे कट्टर विरोधक गुलाबराव पाटील यांनी केला होता. देवकर यांनी अनेक आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केले आहेत. त्यावर पांघरून घालण्यासाठी गुलाबराव देवकर यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर यांची चौकशी सुरू झाली आहे.



