Home » जळगाव » जळगाव महानगरपालिकेत शिस्तीचा धडाका: ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जळगाव महानगरपालिकेत शिस्तीचा धडाका: ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर महानगरपालिकेत शिस्तभंगाची कारवाई कडक करण्यात आली असून, कर्तव्यावर उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहिल्याबद्दल या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ (Show Cause) नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.

महानगरपालिकेमध्ये सोमवारी दि.२३ फेब्रुवारी रोजी महापौर दीपमाला काळे यांनी प्रवेशद्वारावर उभे राहून वेळेवर कर्मचारी येतात की नाही याबाबत पाहणी केली होती. या पाहणीमध्ये अनेक जण वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तात्काळ कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. यानुसार, कार्यालयीन वेळेत दि २५ फेब्रुवारी रोजी सकाळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उपस्थितीची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान संबंधित कर्मचारी आपल्या विभागात वेळेवर उपस्थित नसल्याचे समोर आले. वरिष्ठांच्या सूचनांचे गांभीर्याने पालन होत नसल्याचे यावरून सिद्ध होत असून, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रशासनाने नोटिसीत नमूद केले आहे.

३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
उपायुक्त (जळगाव शहर महानगरपालिका) यांनी काढलेल्या या नोटिसीनुसार, संबंधित ११ कर्मचाऱ्यांना ३ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विहित मुदतीत खुलासा न आल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांना याप्रकरणी काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ अन्वये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या या कडक भूमिकेमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, प्रशासनात शिस्त लावण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *