जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. माऊलीनगरात एका ५ वर्षीय बालकावर तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार, दि. १९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात बालकाच्या मानेवर खोल जखम झाल्याने त्याला चार ते पाच टाके पडले असून, सध्या त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बाल विभागात उपचार सुरू आहे. समर्थ रवींद्र पाटील हा दुकानाकडून घरी येत असताना, परिसरातील तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी मागून त्याच्यावर हल्ला केला. रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने कुत्र्यांना तेथून पळवित लावत मुलाची सुटका केली. यानंतर, तत्काळ मुलाच्या वडिलांना बोलवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शहरात मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या भागात १५ नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी हल्ले केले आहे. माऊलीनगरात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
