Home » जळगाव » सुसाट डंपरचा कहर; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

सुसाट डंपरचा कहर; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

भाजीपाला घेऊन घरी निघालेल्या ५६ वर्षीय प्रौढाला सुसाट डंपरने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता काळिंका माता मंदिराजवळ घडली. प्रभाकर रघुनाथ पाटील (रा. तैली चौक, जुने जळगाव) असे मृताचे नाव असून, अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करत प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी सायंकाळी ते भाजीपाला घेऊन पायी घरी जात असताना नशिराबादकडून भरधाव वेगात येणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरचे चाक थेट त्यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर नागरिकांनी डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता पुढे पळ काढला. अखेर स्थानिकांनी डंपर अडवला; मात्र चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला.

याच चौकात साधारण वर्षभरापूर्वीही डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. वारंवार अशा दुर्घटना होत असल्याने संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमून डंपरवर दगडफेक करत काचा फोडल्या. सुमारे हजार ते दोन हजार नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह एमआयडीसी, शनिपेठ व रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जवळपास दोन तास तणावपूर्ण वातावरण कायम होते. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

कोल्हे विद्यालयाच्या रस्त्यावरून दिवसभर विद्यार्थ्यांची ये-जा असते. तरीही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नागरिकांनी ती तत्काळ बंद करण्याची मागणी केली. तसेच या भागात कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळेच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *