एरंडोल : प्रतिनिधी
वन्यप्राण्यांपासून बचावासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्याने त्याचा धक्का लागल्याने एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू ओढवला. एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात बुधवार, 20 रोजी समोर आली. या घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सविस्तर वृत्त असे कि, मध्य प्रदेशातील एकाच परिवारातील सदस्य शेतात काम करण्यासाठी जात असताना वरखेडी गावातील शेतकर्याच्या शेताजवळून जात असताना या परिवारातील सदस्यांना वीज तारेच्या कुंपणाचा शॉक बसला व त्यात पाच जण एका पाठोपाठ एक मयत झाले. या दुर्दैवी घटनेत 40 वर्षांच्या दोन महिला, 45 वर्षांचा एक पुरुष, सहा वर्षांची एक मुलगी आणि आठ वर्षांचा एक मुलगा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात हलवले आहेत.
