Home » राष्ट्रीय » ओला दुष्काळ नसला तरी… : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

ओला दुष्काळ नसला तरी… : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दुष्काळसदृश सवलती आणि मदतीचे आश्वासन दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६० लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी २,२१५ कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असून, यासाठी ई-केवायसीची अट शिथिल करून अ‍ॅग्रीस्टॅकच्या आधारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.”

या निर्णयामुळे येत्या दोन-तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पुढील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, अनेक भागांत अजूनही पाणी साचलेले असल्याने सर्व माहिती संकलनास थोडा वेळ लागणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “तीन-चार दिवसांत संपूर्ण माहिती जमा केली जाईल आणि त्यानंतर शेती, घरे, विहिरी आणि जमिनीचे नुकसान यासाठी भरपाईचे निर्णय घेतले जातील.”

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची कायदेशीर तरतूद नसली तरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दुष्काळसदृश सवलती लागू केल्या जाणार आहेत. सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी एक सर्वंकष धोरण निश्चित करून पुढील आठवड्यात मदतीची घोषणा करण्यात येईल. “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्राधान्यक्रम आहे,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *