चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेहोळ येथे जुन्या वैमनस्यातून शेतकरी संभाजी गणपत पवार यांच्या कुटुंबावर गावातील सात जणांनी कुऱ्हाडी व लाकडी दांडक्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पवार यांच्या कुटुंबातील महिला व युवक गंभीर जखमी झाले आहेत.
तक्रारदार संभाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी तलाठी व गावातील काही जणांविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याच कारणावरून दि.२६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता रोहीदास प्रताप पवार, वाडीलाल रोहीदास पवार, श्यामकांत भाईदास पवार, शालीक भाईदास पवार, परमेश्वर साहेबराव पवार, विनोद गरमक पवार व कांतीलाल रोहीदास पवार हे सातजण घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली तसेच कुऱ्हाडीच्या दांडक्याने व दगडांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून जखमी केले. महिलांनाही मारहाण करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
