जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरनार गावात मंगळवारी सकाळी ६ वाजता कौटुंबीक वादातून पतीने आपल्या पत्नीवर कुन्हाडीने हल्ला केला आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून, ती मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बोरनार येथील आनंदा उर्फ छोटू महारु धामोळे (वय ४५, व्यवसाय शेती) आणि त्यांची पत्नी रेखा धामोळे (वय ४१) यांच्यात मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून संतापलेल्या छोटू धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यात कुन्हाडीने वार केला. या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी झाल्या. पत्नीचा मृत्यू झाला, असे समजून छोटू धामोळे यांनी सकाळी ६ वाजता म्हसावद रेल्वे गेटजवळ जाऊन रेल्वेखाली आत्महत्या केली.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे, तर लहान मुलगा पप्पू हा दहावीत शिकत आहे. त्यांच्यासह घरात आनंदा धामोळे यांच्या आई यादेखील राहतात. मात्र, धामोळे यांच्या आई दोन दिवसांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे घरात धामोळे दाम्पत्य व दोन्ही मुलेच होती. दरम्यान, नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद सुरू होते. मंगळवारी पहाटेही दाम्पत्यात वाद झाला, याच वादातून हा दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेच्या वेळी धामोळे यांची दोन्ही मुले, विनोद (वय १९) आणि पप्पू (वय १५) खालच्या घरात झोपलेली होती. पती – पत्नी वरच्या पत्र्याच्या खोलीत झोपली होती. सकाळी ६ वाजता मोठा मुलगा विनोद झोपेतून उठल्यावर तो वरच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याला आई जखमी अवस्थेत दिसली. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले. वडील घरात नसल्याने ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता, सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळाजवळ आढळून आला. या घटनेने दोन्ही मुलांवर मोठा आघात झाला आहे.
