April 29, 2025 7:36 pm

Home » जळगाव » अमळनेर » फटाका फॅक्टरीत स्फोट प्रकरणी : गोविंद शिरोळेंसह तिघांना १० वर्षांची शिक्षा !

फटाका फॅक्टरीत स्फोट प्रकरणी : गोविंद शिरोळेंसह तिघांना १० वर्षांची शिक्षा !

अमळनेर : प्रतिनिधी

पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत १६ वर्षापूर्वी लागलेल्या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पारोळा येथील सावित्री फायर वक्स या फटाका फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी मोठी आग लागली होती. या ठिकाणी स्फोटक पदार्थ असल्याने आगीचे प्रचंड लोळ उठत होते. तत्काळ आग पसरून त्या आगीत फटाका फैक्टरीतील पारोळा येथील खी, पुरुष कामगार, बाल कामगार यांच्यासह २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर जवळपास ३९ जण जखमी झाले होते. या बाबत पारोळा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (२), ३३७, ३३८, २१२ व स्फोटक कायदा ९ (ब), ९ (व) (१) तसेच बाल कामगार कायदा १४ (१) प्रमाणे फटाका फैक्टरीचे मालक गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे व मनीषा चंद्रकांत शिरोळे यांच्यासह ९ जणांवर मृत्यूस कारणीभूत व स्फोटक पदाथांबाबत बेजबाबदार पणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेनंतर तपासात असे आढळून आले होते की, आग लागण्याच्या काही दिवस आधीच कारखान्याच्या परवान्याची मुदत संपली होती. तर कामगारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण ही दिले नव्हते. तसेच अन्य सुविधा ही नव्हत्या, बालकामगारांचे नियम पाळले गेले नव्हते. दरम्यान, हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या प्रकरणी स्फोटक कारखान्यांबाबत असलेल्या आयुक्तांकडे ही सुनावणी होऊन जखमी व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली होती. तर याच प्रकरणात अमळनेर न्यायालयात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात एकूण ३८ साक्षीदार फितूर झाले होते, मात्र, न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ. योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, जबाब घेणारे तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून फॅक्टरी मालक गोविद एकनाथ शि-रोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे व मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४ (२) प्रमाणे १० वर्षांचा कारावास तर स्फोटक कायदा कलम ९(ब) प्रमाणे २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा तसेच अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. या खटल्यास सरकार पक्षातर्फे अॅड. राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!