Home » जळगाव » ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा विसर; खान्देश महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

‘जय जय महाराष्ट्र माझा’चा विसर; खान्देश महोत्सव वादाच्या भोवऱ्यात

जळगाव : प्रतिनिधी

खान्देशची संस्कृती, कला आणि खाद्यपरंपरेचा वारसा जगासमोर मांडण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव’ उत्साहात सुरू झाला. मात्र पहिल्याच दिवशी कार्यक्रमात राज्यगीताचा समावेश न झाल्याने व प्रोटोकॉलचे पालन न केल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे जळगावकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ सादर करण्यात आले; मात्र महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ वाजवण्यात आले नाही. या बाबत महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

दुसरीकडे, महापालिका आयुक्तांनी हा कार्यक्रम शासकीय नसून सांस्कृतिक स्वरूपाचा असल्याने राज्यगीताची अनिवार्यता नव्हती, अशी भूमिका घेतल्याने वाद अधिकच चिघळला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात राज्यगीताचा सन्मान व्हायलाच हवा, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. कार्यक्रमादरम्यान नगरसेवकांच्या नावांचा ज्येष्ठतेनुसार प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याची तक्रारही पुढे आली आहे. काही महिला नगरसेवकांच्या नावांतही चुका झाल्याचे समोर आले. लोकप्रतिनिधींच्या सन्मानाबाबत झालेल्या या दुर्लक्षामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

‘खान्देश महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून खान्देशी मातीचा गंध, अहिराणी बोली, लोककला आणि खाद्यसंस्कृती यांचा प्रचार-प्रसार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमात अस्मितेचे प्रतीक असलेल्या राज्यगीताचा समावेश असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून काय अपेक्षित?

  • पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये राज्यगीताचा सन्मानपूर्वक समावेश

  • लोकप्रतिनिधींच्या प्रोटोकॉलचे काटेकोर पालन

  • पहिल्या दिवशी झालेल्या त्रुटींचे स्पष्टीकरण आणि जबाबदारी निश्चिती

महापौरांच्या हस्तक्षेपानंतर पुढील दिवसांमध्ये महोत्सवाचे आयोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने होईल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. खान्देश महोत्सव हा जळगावच्या वैभवाचा उत्सव ठरावा, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *