पुणे : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील उमर्टी गावात पुणे पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय अवैध शस्त्रपुरवठा करणाऱ्या तब्बल ५० कारखान्यांचा भांडाफोड केला. गत काही दिवसांत गुन्हेगारांकडून जप्त झालेल्या शस्त्रांवर ‘यूएसए’ असा शिक्का दिसून आल्यानंतर तपासाची दिशा बदलली. ‘यूएसए’ म्हणजे ‘मेक इन यूएसए’ नव्हे, तर ‘उमर्टी शिकलगार आर्म्स’ असा उलगडा झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी तीन आठवडे तयारी करून ‘ऑपरेशन उमर्टी’ राबवले.

उमर्टी गावातूनच महाराष्ट्रासह विविध राज्यांत बेकायदा शस्त्रांचा पुरवठा दलालांमार्फत केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. जळगाव, धुळे मार्गे ही शस्त्रे दुचाकी व चारचाकी वाहनांतून महाराष्ट्रात आणली जात असल्याचेही उघड झाले.
छाप्यावेळी संपूर्ण गावाने पुणे पोलिस पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र शीघ्रकृती दल, अश्रुधूर पथक आणि मध्य प्रदेश एटीएसच्या मदतीने पोलिसांनी कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या मोहिमेत तब्बल ५० बेकायदा शस्त्रनिर्मिती कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले तर ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय २१ पिस्तुले, अनेक बॅरल, मँगझीन स्प्रिंग, पाईप्स आणि शस्त्रनिर्मितीची इतर सामग्री जप्त करण्यात आली.
उमर्टी गावाचा अवैध शस्त्रनिर्मितीचा इतिहास दोन ते तीन दशकांपूर्वीचा असून येथे लेथ मशीन, हाताने घासणी आणि पारंपरिक पद्धतीने शस्त्रे तयार केली जातात. मागणीनुसार केवळ ५-६ तासांत शस्त्र तयार करून ते १५ ते २० हजार रुपयांत ओळखीच्या व्यक्तींना पुरवले जात होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे. या कारवाईनंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांत शस्त्रपुरवठ्याचे मोठे जाळे उद्ध्वस्त झाले असून तपास अधिक गतीमान करण्यात आला आहे.



