Home » ताज्या » पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर ; पाचोरा हादरले !

पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर ;  पाचोरा हादरले !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हयात खूनाची किंवा प्राणघातक हल्ल्याची सलग चौथ्या दिवशी घटना घडली आहे. १७ रोजी लालगोटा (मुक्ताईनगर) येथे एका व्यक्त्तीचा, १८ रोजी जळगावात एका तरुणाचा, १९ रोजी बोरनार येथे पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून पतीची आत्महत्या आणि आता पाचोरा येथे संशयातून पत्नीच्या खूनाची ही घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे चारित्र्याच्या संशयासह माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी नितीन दौलत शिंदे (वय ३५) याने पत्नी अर्चना ऊर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) हिचा खून केला. त्यानंतर तो स्वतः लोहारा पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताचा भाऊ आकाश सपकाळ (रा. शिवना, ता. सिल्लोड) याने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आणि अर्चना यांच्यात वाद सुरू होता. त्यात नितीन हा अर्चना हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच माहेरून दहा लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला होता. त्या वादातूनच मध्यरात्री अर्चना ही झोपेत असताना नितीन याने तिच्यावर हल्ला चढवत शस्त्राने वार केले. अर्चना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती आईला दिली. तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असतानाच रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण खून केल्याचे सांगत नितीन हा लोहारा दूरक्षेत्र येथे पोलिसांच्या स्वाधीन झाला. याप्रकरणी मयत अर्चना हिची सासू बेबाबाई हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी अटकेत असलेल्या नितीन आणि बेबाबाई शिंदे यांना पाचोरा न्यायालयात हजर केले. दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  मयत अर्चना ही शिवना येथील आपल्या नातेवाइकांना भेटून सायंकाळीच लोहारा येथे आल्याचे बोलले जात आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. या घटनेनंतर या चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *