मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भंडारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुका पार पडल्या. यानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विरोधात रोष पाहायला मिळत आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेसेना हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणय फुके यांनी शिवसेनेची माफी मागावी, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
भंडाऱ्यामध्ये भाजपच्या मेळाव्यामध्ये परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केले. यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘अनेकजण माझ्यावर आरोप करतात, मी आरोपांना उत्तर देत नाही. पण त्यादिवशी माझ्या लक्षात आले. जर मुलगा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवत असेल, तर त्याचे नाहीतर त्याच्या आईचे कौतुक केले जाते. मुलाने काहीतरी चांगलं केलं, तर त्याने किंवा आईने केले असे म्हटले जाते. मुलाने वाईट केले, तर त्याचा दोष बापाला दिला जातो. तेव्हा मला माहीत झालं, की शिवसेनेचा बाप मीच आहे. नेहमी खापर माझ्यावरच फोडले जाते’, असे वक्तव्य परिणय फुके यांनी केले आहे.
परिणय फुके यांच्या विधानावर शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्याने केलेल्या विधानाला पक्षाचे विधान म्हणून बघता कामा नये. अशी विधाने करण्यापासून सर्वांनी संयम राखायला हवा. हे युतीचे शासन आहे. लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, आपल्याला मोठ्या अपेक्षांनी लोकांनी निवडून दिले आहे. तेव्हा जनतेची जास्तीत जास्त सेवा कशी होईल यावर भर दिला पाहिजे’, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर बारा तासांमध्ये परिणय फुके यांनी माफी मागितली नाही, तर शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत वाद उफाळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
