मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असताना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांबाबत असलेल्या सरकारच्या धोरणांवर बच्चू कडू यांनी यावेळी सडकून टीका केली. त्यांनी सावली तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या पाथरी गावात जनसभा घेऊन 28 तारखेच्या आंदोलनाची भूमिका शेतकऱ्यांसमोर स्पष्ट केली. सरकार आम्हाला सातत्याने लुटत आहे. आम्ही पेटणार नाही, पण वेळ पडली तर घरात बांधून ठेवू, अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण आंदोलन करत असल्याचे सांगितले. तसेच, यापुढे कोणत्याही आरक्षणाच्या व्यासपीठावर न जाता केवळ शेतकऱ्यांसाठीच लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांसाठी एवढा संघर्ष करूनही अपेक्षित साथ मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
दरम्यान, सोलापूरमधील सभेत बोलताना बच्चू कडू म्हणाले होते की, आता आम्हाला सांगता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. देशातील 200 उद्योगपत्यांचे तुम्ही 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांचे 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होते? आमचे सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस द्यायला पाहिजे, त्यासोबतच जीएसटीचा परतावा देणार असेही सांगितले होते, मात्र काहीच होते नाही. अतिवृष्टी झाली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. सोयाबीन 3 हजार 400 रुपयांनी विकायला निघणार आहे त्यावर सरकार बोलायला तयार नाही. 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली नाहीतर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन टाकणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
