Home » राज्य » छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान? व्हिडिओ व्हायरल होताच फोटो हटवले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान? व्हिडिओ व्हायरल होताच फोटो हटवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढत्या निषेधानंतर संबंधित रिसॉर्ट व्यवस्थापनाने छायाचित्रे काढून टाकली असून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

माहितीनुसार, हरियाणाच्या सिकरी येथील मथुरा रोडवर असलेल्या ‘मिलन रिसॉर्ट’च्या एका बँक्वेट हॉलमध्ये पुरुषांच्या वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला होता. तर महिलांच्या वॉशरूमच्या दरवाजावर राणी पद्मिनी (पद्मावती) यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. या प्रकाराचा व्हिडिओ तेथे आलेल्या एका व्यक्तीने चित्रीत करून सोशल मीडियावर अपलोड केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला. शिवप्रेमींनी याला ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा अपमान असल्याचे म्हटले आणि संबंधित छायाचित्रे तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली. काहींनी रिसॉर्ट चालकांना इशाराही दिला.वाढत्या दबावानंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने दोन्ही छायाचित्रे हटवून त्यांच्या जागी घोड्यांची छायाचित्रे लावली. त्याचेही फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. हे रिसॉर्ट नवीन वशिष्ट आणि प्रदीप वशिष्ट यांचे असल्याचा दावा काही माध्यमांतून करण्यात येत असला, तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रदीप वशिष्ट हे माजी संचालक असल्याची माहितीही समोर येत आहे.

या घटनेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही. महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या सन्मानाशी छेडछाड करणे म्हणजे महाराष्ट्राच्या भावनांचा अवमान आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच संबंधित व्यवस्थापनाने तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा (आरपीआयचे कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत असून, पोलिसांकडून चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीकांबाबत संवेदनशीलता राखावी, अशी मागणी विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *