जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वडनगरी येथे आज सकाळी महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपशावर धडक कारवाई करत वाळू काढण्याचे यंत्र आणि दोर जप्त केले. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या पथकासह थेट नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महसूल प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी काही मोजक्या अधिकाऱ्यांकडून मध्यरात्री पकडलेली वाहने सोडून दिली जात असल्याची चर्चा रंगली होती.
या पार्श्वभूमीवर दि. २४ रोजी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी थेट वडनगरी येथील नदीपात्र गाठून पाहणी केली. तपासादरम्यान वाळू उपशासाठी वापरले जाणारे यंत्र आणि दोर आढळून आले. तत्काळ पंचनामा करून ते साहित्य जप्त करण्यात आले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राचे पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत असताना प्रशासनाच्या या कारवाईमुळे कठोर संदेश गेला आहे. अवैध वाळू वाहतुकीवर अधिक कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या धडक मोहिमेमुळे जळगाव परिसरातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून, महसूल विभागाच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


