नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपुर शहरात सोमवारी औरंगजेबाच्या कबरीवरून झालेली दगडफेक, जाळपोळ, अश्रूधूर आणि उसळलेल्या हिंसाचारामागील खरा मास्टरमाईंड हा एमडीपीचा शहर अध्यक्ष फईम शमीम खान (वय 38 वर्षे, राहणार यशोधरानगर) असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले आहे.
अटकेतील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली गेली आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत न्यायालयीन सुनावणी सुरू होती. याच फईम खानने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात एमडीपीच्या वतीने निवडणूक लढविली होती. मात्र साडेसहा लाखांवर मतांनी त्याचा दारुण पराभव झाला. सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दिवसभर महाल गांधी गेट शिवतीर्थ परिसरात आणि शेजारच्या चिटणीस पार्क, भालदारपुरा हंसापुरी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथावणी देण्याचे काम या फईम खानने केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
आतापर्यंत या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या 19 आरोपींना न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गणेशपेठ पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर केले. नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता असून विविध भागात खबरदारीचा उपाय म्हणून दोन हजारावर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अनेक भागातील संचारबंदी अद्यापही कायम आहे.
